अक्कलकोट ला कसे जायचे? स्वामींच्या दर्शनाची संपूर्ण माहिती, कुठे राहायचे आणि काय पाहाल!Akkalkot प्रवास मार्गदर्शक

Admin@devashtan
13 Min Read
akkalkot

Akkalkot Darshan: आपल्या महाराष्ट्रात अशी काही ठिकाणं आहेत, जिथं पाऊल टाकताच एक वेगळीच शांतता आणि ऊर्जा जाणवते. Akkalkot हे असंच एक पवित्र ठिकाण! सोलापूर जिल्ह्यात, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेलं हे छोटं शहर, पण महत्त्व मात्र खूप मोठं. का? कारण इथंच आपले श्री स्वामी समर्थ महाराज १८५६ साली आले आणि तब्बल २२ वर्षं त्यांनी इथे वास्तव्य केलं. १८७८ मध्ये त्यांनी समाधी घेतली असली, तरी ते आजही इथेच आहेत, याची प्रचिती तुम्हाला वटवृक्षाखालील समाधी स्थळावरच्या ‘हम गया नही जिंदा है’ या ब्रीदवाक्यातून येईलच. लाखो भक्त दररोज केवळ याच श्रद्धेनं akkalkot ला येतात आणि स्वामींच्या आशीर्वादाचा अनुभव घेतात. तुम्ही एकदा जाऊन बघाच!

Contents
श्री स्वामी समर्थ महाराजांचा अलौकिक प्रवास आणि अवतार!श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान: जिथे स्वामींनी दिला दिलासा!श्री खंडोबा मंदिर: स्वामी समर्थांचं पहिलं पाऊल जिथे पडलं!श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मठ (चोळाप्पा महाराजांचं घर): २१ वर्षांच्या वास्तव्याचं ठिकाण!श्री गुरु मंदिर (बाळाप्पा महाराज मठ): जिथे उमटली स्वामींची पाऊले!श्री हक्क्याचे मारुती मंदिर: बाळाप्पा महाराजांची तपोभूमी!श्री स्वामी समर्थ राजेराय मठ: जिथे स्वामींचा आराम!श्री शमीविघ्नेश गणेश मंदिर: स्वामींच्याच भूमीवर गणपती बाप्पा!Akkalkot मध्ये श्री स्वामी समर्थ उपासना कशी करावी?Akkalkot मध्ये राहण्याची सोय: भक्तनिवास आणि इतर माहिती!यात्री भुवन Akkalkot भक्तनिवास (श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ)

श्री स्वामी समर्थ महाराजांचा अलौकिक प्रवास आणि अवतार!

तुम्हाला माहीत आहे का, आपले स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्तात्रेयांचाच अवतार आहेत! त्यांची लीला खरोखरच बुद्धीला अगम्य आहे. ११४९ साली पंजाबमधील छेली खेडे गावात प्रकट होऊन त्यांनी अखिल विश्वात आणि भारतभरात तब्बल २२९ वर्षं भ्रमण केलं. पुढे १३७८ साली पिठापूर (आंध्रप्रदेश) येथे श्रीपाद श्रीवल्लभ नावाचं नवीन रूप धारण करून १५० वर्षं अंधश्रद्धा दूर करण्याचं काम केलं. त्यानंतर १५२८ मध्ये त्यांनी कारंजामधून श्री नृसिंहसरस्वती हा अवतार घेतला आणि १०० वर्षं औदुंबर, वाडी, गाणगापूर यांसारखी महान तीर्थक्षेत्रं घडवली. १६७८ साली नृसिंहसरस्वती अवताराची सांगता करून त्यांनी पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ हे रूप धारण केलं आणि १८५६ साली akkalkot मध्ये प्रवेश करून त्यांनी भक्तांवर कृपादृष्टी ठेवली. हा त्यांचा अखंड प्रवासच आपल्याला खूप काही शिकवतो.

Kolhapur Mahalaxmi मंदिरात कसे जायचे? काय पाहाल? संपूर्ण A ते Z प्रवासाची माहिती!

श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान: जिथे स्वामींनी दिला दिलासा!

Akkalkot मध्ये आल्यावर सगळ्यात आधी जिथे जायचं ते म्हणजे श्री वटवृक्ष (Akkalkot) स्वामी समर्थ महाराज देवस्थान! स्वामींनी त्यांच्या २२ वर्षांच्या वास्तव्यापैकी बराच काळ याच वटवृक्षाखाली घालवला. त्यांनी इथेच बसून अनेक लीला केल्या, भक्तांची दुःखं दूर केली आणि त्यांना स्वयंभू बनवलं. आजही हा वटवृक्ष स्वामींच्या अस्तित्वाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. इथे आल्यावर सगळ्यात आधी या पवित्र वटवृक्षाचं दर्शन घ्या. डोळे मिटून मनातल्या भावना, दुःखं स्वामींसमोर व्यक्त करा. कारण याच वटवृक्षाखाली बसून स्वामींनी सर्वाधिक भक्तांना आशीर्वाद दिले आहेत आणि त्यांच्या समस्या दूर केल्या आहेत. वटवृक्षाचं दर्शन झाल्यावर बाजूला असलेल्या मुख्य मंदिरात जा. तिथे महाराजांच्या पादुका आणि मूर्ती आहेत. एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती तुम्हाला तिथे येईल. बाजूलाच स्वामींचं शेजघर आहे, जिथे त्यांचा पलंग आणि इतर वस्तू ठेवलेल्या आहेत. या सगळ्याचं दर्शन न विसरता घ्या. मुख्य मंदिरासमोर ज्योतिबा मंडप आहे, जिथे नेहमी आध्यात्मिक कार्यक्रम, पारायणं आणि प्रवचनं सुरू असतात. इथली सकाळची काकड आरती आणि रात्रीची शेज आरती अनुभवण्यासारखी असते. मंदिरात दर्शनाच्या वेळा सकाळी ५ ते रात्री १० पर्यंत असतात.

श्री खंडोबा मंदिर: स्वामी समर्थांचं पहिलं पाऊल जिथे पडलं!

Akkalkot मध्ये स्वामी समर्थ महाराजांचं पहिलं आगमन जिथे झालं, ते म्हणजे श्री खंडोबा मंदिर. त्यांनी इथेच पहिले तीन दिवस वास्तव्य केलं, त्यामुळे या ठिकाणाला खूप महत्त्व आहे. सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वी, अक्कलकोट संस्थानच्या धार्मिक राणीसाहेब लक्ष्मीबाईंना जेजुरीच्या खंडेरायाबद्दल खूप श्रद्धा होती. त्यांना वाटलं, आपल्या इथेही खंडेरायाचं मंदिर असावं. त्या जेजुरीहून खंडेराया, म्हाळसा आणि बाणाई यांच्या मूर्ती घेऊन आल्या आणि Akkalkot इथे मंदिर बांधून त्यांची प्रतिष्ठापना केली. शके १७७९ (सन १८५७) मध्ये, ललित पंचमीच्या बुधवारी, याच खंडोबा मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले! त्यांनी Akkalkot इथल्या मूर्तींच्या मुखवट्यांशी खेळायला सुरुवात केली. आजही त्या मूर्ती समाधी मंदिरात पाहायला मिळतात. स्वामींनी Akkalkot इथेच त्यांची पहिली अद्भुत लीला दाखवली होती. एका फकिराने त्यांची चेष्टा केली असता, त्यांनी रिकाम्या चिलमीतून अग्नी आणि धूर काढून सगळ्यांना चकित केलं होतं. गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन, पुण्यतिथी यांसारखे उत्सव इथे उत्साहात साजरे होतात. बऱ्याच स्वामी भक्तांना या Akkalkot मंदिराची माहिती नसते, पण तुम्ही जेव्हा akkalkot ला जाल, तेव्हा न चुकता इथे जाऊन नतमस्तक व्हा. जिथे स्वामींनी पहिलं पाऊल ठेवलं, त्या स्थानाचं महत्त्व अनमोल आहे!

श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मठ (चोळाप्पा महाराजांचं घर): २१ वर्षांच्या वास्तव्याचं ठिकाण!

स्वामींचे परमभक्त चोळाप्पा महाराज यांचं घर म्हणजेच आजचा श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मठ! स्वामींनी इथे तब्बल २१ वर्षं वास्तव्य केलं आणि इथेच समाधी घेतली. समाधी घेण्यापूर्वी, त्यांनी स्वतः चोळाप्पांच्या वाड्यातील गाभाऱ्यात डाव्या बाजूला आम्रकोटेश्वर शिवलिंग, वरती खंडोबा, म्हाळसा आणि बाणाई यांच्या मूर्तींची स्थापना केली. सोबत उजव्या सोंडेच्या मयुरेश्वर गणपतीची मूर्तीही स्थापन केली. मुख्य समाधीवर अलंकार केलेले आहेत आणि त्याखाली एक तळघर आहे, जिथे आजही स्वामींचा देह असल्याचं मानलं जातं. स्वामी दुपारी वटवृक्ष मंदिराजवळ बसायचे आणि संध्याकाळी चोळाप्पांच्या वाड्यात मुक्काम असायचा. स्वामींनी चोळाप्पांना आशीर्वाद दिला होता की, ‘तुझे आणि माझे सप्तजन्माचे ऋणानुबंध आहेत, मी तुझ्या घरी तुझ्या साथीला इथेच बसून राहणार आहे.’ आजही चोळाप्पांच्या वंशजांकडून इथे अखंड सेवा सुरू आहे. पहाटेची आरती, दुपारचा नैवेद्य आणि संध्याकाळची शेजारती चोळाप्पा परिवारच करत असतो. सध्या चोळाप्पा महाराजांचे पाचवे वंशज ही परंपरा सांभाळत आहेत. स्वामींनी चोळाप्पांना दिलेल्या पादुका आजही इथे पाहायला मिळतात. समाधी मठाच्या बाजूला असलेल्या चोळाप्पा महाराजांच्या वाड्यात स्वामींनी पुनरुज्जीवित केलेली विहीर, रुद्राक्ष माळ आणि स्वामींचा अंगरखा यांचं दर्शन घेता येतं. बाजूलाच स्वामींचं शेजघर आहे, जिथे त्यांचा पलंग आजही आहे. akkalkot ला गेल्यास हे ठिकाण नक्की भेट द्यायला पाहिजे.

श्री गुरु मंदिर (बाळाप्पा महाराज मठ): जिथे उमटली स्वामींची पाऊले!

बाळाप्पा महाराज मठ हे स्वामींचे आणखी एक महत्त्वाचं स्थान. स्वामींचे परमभक्त बाळाप्पा यांची समाधी इथेच आहे. स्वामींनी बाळाप्पांना चरण पादुका देऊन स्वतंत्र मठ बांधायला सांगितलं होतं आणि यालाच बाळाप्पा मठ किंवा गुरुमंदिर असंही म्हणतात. गाभाऱ्यात नागाचा फणा असलेली जी मूर्ती आहे, ती बाळाप्पा महाराजांची समाधी आहे. इथेच छत्रीखाली श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे आणि तिथेच स्वामींनी बाळाप्पा महाराजांना प्रसाद म्हणून दिलेल्या मूळ चिन्मय पादुका आहेत. याच पादुका घेऊन बाळाप्पा महाराजांनी हा मठ स्थापन केला. मठाच्या स्थापनेला १२४ वर्षं पूर्ण झाली आहेत. उजव्या बाजूला श्रीमद सद्गुरू गंगाधर महाराज यांची समाधी आहे, जे बाळाप्पा महाराजांनंतर गादीवर आले. गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला अक्कलकोटचे गजानन महाराज शिवपुरे यांचीही समाधी आहे. ही अखंड गुरु-शिष्य परंपरा असल्यामुळे याला गुरुमंदिर असंही म्हणतात. २५ नोव्हेंबर २०१७ रोजी मठाच्या छताचं नूतनीकरण करताना, जुन्या फरश्या बदलून ग्रॅनाईट फरश्या बसवल्या जाणार होत्या. पण प्रत्यक्ष काम सुरू होण्याआधी, फरशीवर जागोजागी स्वामींची पाऊले दिसली! आजही ती पाऊले इथे स्पष्टपणे दिसतात आणि त्यांना मार्क केलेलं आहे. बाळाप्पा मठातील गंगाधर महाराजांच्या समाधीजवळ स्वामी समर्थ महाराजांचा मूळ फोटो लावलेला आहे, जो अमेरिकेच्या कोडॅक कंपनीने १८७२ साली काढलेला आहे. स्वामी हयात असताना काढलेला हा भारतातील पहिला फोटो आहे, ज्यात ते त्यांच्या सर्व शिष्यांसोबत आहेत. इथे अन्नछत्रही आहे, जिथे स्वामी भक्तांना पंगत वाढण्याची सेवा करण्याची संधी मिळते. बाळाप्पा महाराज तब्बल २२ वर्षं स्वामींच्या सेवेत प्रत्यक्ष होते.

श्री हक्क्याचे मारुती मंदिर: बाळाप्पा महाराजांची तपोभूमी!

अक्कलकोटमधील श्री हक्क्याचे मारुती मंदिर समर्थ रामदास स्वामींनी १६०० साली स्थापन केलं होतं. इथली मारुतीरायाची मूर्ती दक्षिणमुखी आहे आणि तिचा चेहरा मानवरूपी आहे. या मंदिराचं विशेष महत्त्व म्हणजे, स्वामींचे शिष्य बाळाप्पा महाराज, जे मूळचे कर्नाटकातील होते, त्यांना त्यांच्या भाऊबंदानी विषप्रयोग केला होता. त्यावेळी ते akkalkot ला आले आणि श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार त्यांनी याच मंदिरात बारा वर्षं तप केलं! इथेच श्री समर्थ रामदास स्वामींच्या चिपळ्या आणि खडावा ठेवलेल्या आहेत. जे भाविक अक्कलकोटमध्ये येतात आणि ज्यांना या पवित्र स्थानाची माहिती आहे, ते इथे न विसरता दर्शनासाठी जातात. पण ज्यांना माहिती नाही, त्यांनी इथे नक्की जावं. कारण हे स्थान स्वामी महाराजांचे शिष्य बाळाप्पा महाराज यांची तपोभूमी असल्यामुळे याला खूप महत्त्व आहे.

श्री स्वामी समर्थ राजेराय मठ: जिथे स्वामींचा आराम!

१८७७ मध्ये शंकररावांनी बांधलेल्या या मठात स्वामी महाराजांच्या चैतन्य पादुका आहेत. परमपूज्य सदगुरू बेलानाथ बाबांचं वास्तव्यही इथेच होतं. शंकरराव राजेरायन रायबहाद्दूर नावाचे जहागीरदार ब्राम्हसंबंध आणि कुष्ठव्याधीने त्रस्त होते. औषधांनी फरक न पडल्यामुळे ते सहकुटुंब तीर्थाटन करत गाणगापूरला उपासना करत होते. तेव्हा श्री दत्त महाराजांनी त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला, “मी अक्कलकोटात श्री स्वामी समर्थांच्या रूपात आहे, तिकडे ये.” यानुसार शंकरराव akkalkot ला आले आणि त्यांना स्वामी महाराजांच्या अवतार कार्याची माहिती मिळाली. त्यांची व्याधी बरी होण्यासाठी त्यांनी सुंदराबाईंच्या माध्यमातून स्वामींच्या चरणी दहा हजार रुपये अर्पण करण्याचा संकल्प केला. यावर स्वामी महाराजांनी एका यवनस्मशानभूमीजवळ येऊन लीला केली आणि शंकररावांचं मरण चुकवलं. याचा संदर्भ श्री स्वामी चरित्र सारामृतच्या ९व्या अध्यायात येतो. दहा दिवसांत व्याधी बरी झाल्यावर शंकररावांनी महाराजांना विचारलं, “व्याधी बरी झाल्यावर दहा हजार रुपये देईन असं ठरवलं होतं, त्याचं काय करू?” त्यावर महाराजांनी या पैशातून मठ बांधून पादुकांची स्थापना करण्याचे आदेश दिले. आज्ञेनुसार इथे मठ बांधला गेला. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणांचे ठसे घेऊन पादुका बनवल्या गेल्या आणि स्वामींनी स्वतःच्या हाताने पादुकांची स्थापना केली. त्यांनी हे ‘माझे विश्रांती स्थान’ असेल असंही सांगितलं. मठाच्या गाभाऱ्यात श्री स्वामी समर्थ महाराजांची पूर्णस्वरूपी मूर्ती आहे. पण जोपर्यंत तुम्ही गाभाऱ्यातील दारासमोर वाकून नमस्कार करत नाही, तोपर्यंत पूर्ण मूर्ती दिसत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे – जोपर्यंत आपण आपला अहंकार बाजूला ठेवून स्वामींसमोर नतमस्तक होत नाही, तोपर्यंत स्वामींचे दर्शन होणार नाही. अक्कलकोटला गेल्यावर शंकरराव राजेरायन रायबहाद्दूर मठामध्ये जाऊन स्वामींसमोर नतमस्तक व्हा.

श्री शमीविघ्नेश गणेश मंदिर: स्वामींच्याच भूमीवर गणपती बाप्पा!

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या परिसरात, १९९० साली झाडीझुडपं साफसफाईचं काम सुरू असताना, जमिनीच्या मधल्या भागात एक शमीवृक्ष आढळला. तिथे सपाटीकरण करत असतानाच गणपती बाप्पाची एक मूर्तीही सापडली. त्याच शमीवृक्षाखाली गणपती बाप्पाची स्थापना करून मंदिर आणि सभामंडप बांधण्यात आला आहे. जिथे श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः वास्तव्य केलं, त्याच भूमीवर श्री शमीविघ्नेश गणपती असल्याने या मंदिराचं स्थान आणि महात्म्य खूप मोठं आहे.

Akkalkot मध्ये श्री स्वामी समर्थ उपासना कशी करावी?

Akkalkot मध्ये गेल्यावर स्वामींच्या दर्शनासोबतच त्यांची उपासना करणं खूप महत्त्वाचं आहे. सर्वच मंदिरात अभिषेकाची सोय आहे. तुम्हाला शक्य असेल तर नक्की अभिषेक करा. वटवृक्ष मंदिर आणि समाधी मंदिरात सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत सामूहिक अभिषेक करता येतो. पण ज्यांना अभिषेक करणं शक्य नाही, त्यांनी मंदिरात व्यक्तिगत उपासना जरूर करावी. मनोभावे उपासना केल्यास महाराजांचा आशीर्वाद मिळून आयुष्यातील अडचणी, दुःखं आणि समस्या दूर होऊन आयुष्य आनंदी होतं, यात तिळमात्र शंका नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, उपासना कशी करावी? तुम्ही वटवृक्ष मंदिर किंवा समाधी मंदिरात बसून श्री स्वामी चरित्र सारामृत पाठाचं पारायण करू शकता. ३ अध्याय, ७ अध्याय किंवा संपूर्ण २१ अध्याय असं पारायण करता येतं. २१ अध्यायाचं पारायण करायला साधारण २ तास लागतात. तुमच्याकडे पोथी असेल तर सोबत घेऊन जा, नसेल तर मंदिर परिसरात ती सहज उपलब्ध होते. पारायणासोबत ‘श्री स्वामी समर्थ’ या दिव्य मंत्राच्या ३, ७, ११, किंवा २१ माळा जप जरूर करा. वेळेअभावी पारायण शक्य नसेल तरी जप नक्की करा.

Akkalkot मध्ये राहण्याची सोय: भक्तनिवास आणि इतर माहिती!

यात्री भुवन Akkalkot भक्तनिवास (श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ)

  • अक्कलकोटमध्ये राहण्याची सोय हा स्वामी भक्तांसाठी नेहमीच महत्त्वाचा प्रश्न असतो.
  • श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळामार्फत चालवण्यात येणारं यात्री भुवन अक्कलकोट भक्तनिवास हे खूप चांगला पर्याय आहे.
  • इथे रूम्स अत्यंत माफक दरात उपलब्ध असतात.
  • अन्नछत्र मंडळाच्या परिसरातच, श्री शमीविघ्नेश गणपती मंदिरासमोर या इमारती आहेत.
  • एकूण १०६ रूम्स आहेत, त्यापैकी १८ एसी रूम्स आहेत.
  • सर्व रूम्स स्वच्छ असून पार्किंग, सेक्युरिटी, आणि गरम पाण्याची सोय इथे उपलब्ध आहे.
  • महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यात्री भुवनसाठी कुठल्याही प्रकारचं ऑनलाइन बुकिंग घेतलं जात नाही. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर इथे रूम्स दिल्या जातात, त्यामुळे ऑनलाइन फसवेगिरीला बळी पडू नका.
  • अधिक माहितीसाठी किंवा चौकशीसाठी त्यांचे फोन नंबर आहेत: ०२१८१-२२२५८७ किंवा ९०६७६७०५८७. त्यांची अधिकृत वेबसाईट आहे: swamiannacchatra.org.
  • Akkalkot मध्ये इतरही काही खासगी हॉटेल्स आणि लॉजेस उपलब्ध आहेत, जिथे तुम्ही तुमच्या सोयीनुसार राहू शकता.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *